Showing posts with label पं. भीमसेन. Show all posts
Showing posts with label पं. भीमसेन. Show all posts

Wednesday, March 2, 2011

भीमसेन - एक साठवण

ही पोस्ट येथे पूर्वप्रकाशित आहे.

प्रसंग पहिला
स्थळ - आहिल्यादेवी शाळेचा चौक - शनिवार पेठ, पुणे
साधारण काळ - १९५५ - ५८
एक मोठा चौक. तसा चौक म्हणजे नावाला. चार दिशेने चार रस्ते कसे बसे एका ठिकाणी आले होते म्हणून तो काय चौक. चौकातच मोठी मोठी वडाची झाडं. एक चार पाच वर्षांचा, लहानगा अर्धी चड्डी घातलेला मुलगा चौकातच गाण्याच्या कार्यक्रमासाठी घातलेल्या मोठ्या मांडवात बागडत होता. एकटाच होता खूषीत. त्याच चौकात तर त्याचं घर होतं. आज पंडीत भीमसेन जोशींचे शास्त्रीय संगीत होते ना. थोड्यावेळाने एक उंचपुरा, काळी टोपी घातलेला गायक रंगमंच्यावर येउन बसला. "हा भीमसेन हळूहळू फार गुणी गायक बनतोय. सवाईगंधर्वांचा शिष्य आहे तो! " - कुणीतरी कुजबुजलं. यथावकाश कार्यक्रम सुरु झाला. भीमसेन चा बुलंद आवाज ऐकून रसिक मंत्रमुग्ध व्हायला लागले. बराच वेळ खेळत असलेला लहानगा, भीमसेनजींचा द्रुत सुरु झाल्यावर त्यांच्या आक्रमक हावभावाला, वेगाने जाणार्‍या एखाद्या तानेसोबत एकदम पुढे वाकण्याच्या त्यांच्या सवयीला, गाण्याची छेडखानी करताना त्यांच्या चेहर्‍यावर उमट्लेल्या रेषांकडे पाहून गाल्यातल्या गालात हसत होता. त्याचीच तर त्याला मजा वाटत होती. त्याला कुठे काही गाणे समजत होते? कर्यक्रम संपला तेव्हा लोक म्हणाले, "मजा आला असं गाणं ऐकून!".

प्रसंग दुसरा
स्थळ - जुनी मंडई, बुधवार पेठ, पुणे
साधारण काळ - १९७० - ७२
रात्रीची वेळ. ८ वाजलेले. रस्त्यातच मध्यवर्ती ठिकाणी एक स्टेज बांधलेला. अखिल मंडई मंडळाचा सांस्क्रुतिक कार्यक्रम होता. साहजीकच श्रोत्यांमध्ये मंडईमधले व्यापारी, हमाल, कामगार वर्ग, पुण्याच्या मध्यवर्ती भागात आयोजीत केल्यामुळे आजूबाजूचा रहिवासी परीसर असा खर्‍याअर्थाने बहुजन समाज रस्त्यावर एकवट्लेला होता. रस्त्यावरच सर्वजण बसले होते. आता भीमसेनजींची वाट पाहत होते. कार्यक्रमाची वेळ केव्हाच उलटून गेली होती. मंडई मंडळाचे कार्यकर्ते मघाशीच लगबगीने जाताना दिसले होते. रात्रीचे साडे अकरा वाजले. शेवटी भीमसेन दिसले, त्यांना त्यांचा तोल नीट सावरता येत नव्हता. दोघांनी त्यांना धरले होते. मंचापर्यंत कसे तरी पोहोचवले आणि बैठक मांडली. पंधरा मिनिटातच त्यांनी पहिला अभंग छेडला - "कान्होबा तुझी घोंगडी चांगली." सगळेच उपस्थित शहारले. हळूहळू भक्तिरसात सगळे डोलू लागले. कार्यक्रम पहाटे साडेतीन ला संपला. पंडीतजींची प्रक्रुती नीट नव्हती असं उगाच वाटलं बहुतेक - एक २० - २२ वर्षांचा तरूण मनातल्या मनात म्हणाला.

प्रसंग तीसरा
स्थळ - सारसबाग ते स्वारगेट हा रस्ता, पुणे
साधारण काळ - बहुदा १९८० आसपासचा
पंडीतजीचा नावलौकीक खूपच वाढला होता. जगभरात त्यांचा श्रोत्रुवर्ग तयार झाला होता. सारबागे समोर महलक्ष्मीच्या मंदीराच्या उद्घाटन प्रसंगी पंडीतजींना निमंत्रित केले होते. प्रचंड जनसमुदाय उसळला. संयोजकांसमोर मोठी अड्चण उभी राहिली. स्वारगेट्चा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागणार. वेळीच शक्कल लढवून, संयोजकांनी गर्दीला नेहरू स्टेडियम मध्ये जायची घोषणा केली. पुर्ण मैदानात श्रोते आणि पॅव्हेलियनच्या मुख्य दर्शनी भागात भीमसेन, असा कार्यक्रम सुरु झाला - तिथे एक मध्यवयीन ग्रुहस्थ होता - त्यांने आयुष्यात पहिल्यांदा 'राम रंगी रंगले' हे भजन पहिल्यांदा त्याच वेळेस ऐकले. पुढे एकसेएक अभंग रंगले. लोकांना इतक्या वर्षात आता या कलाकाराची किंबहुना त्या कलेची जबरदस्त ओढ लागली होती.

प्रसंग चवथा
स्थळ - रमणबाग हायस्कूल, नारायण पेठ, पुणे
काळ - आठ- दहा वर्षांपूर्वीचा
कार्यक्रम सुरु होउन तासभर झाला असेल. पंडीतजींचे गाणे एव्हाना खुलले होते. तंबोर्‍यावर साथीला एक ज्येष्ट गायक होते. पंडीतजींच्या पेक्षा वीसेक वर्षांनीच लहान असतील. पंडीतजी ऐशीच्या घरातले होते तरी त्यांचा बुलंद आवाज स्टेजसमोर अगदी जवळ खाली बसलेल्या एका माणसाला खिळ्वून ठेवण्यास पुरुन उरेल असा होता. गात असलेल्या बंदिशीत, पंडीतजी पुन्हा मुखड्यावर आले आणि त्यानी एक हरकत घेतली. साथीच्या गायकाने तिच हरकत जरा घाबरत घाबरत घेतली. तशी सुरातच घेतली, पण अगदीच मुळ्मुळीत ऐकू आली. पंडीतजीनी पुन्हा तीच हरकत ताकदीनिशी घेतली, आणि हातवार्‍याने सुचवलं "असं गा!" त्याने पुन्हा प्रयत्न केला चढा आवाज येइना. नंतर तो इतका घाबरला की तीच हरकत घेण्याचा पुन्हा प्रयत्न भर महोत्सवात अर्धवट सोडला. भीमसेनचा आवाज माझ्या आत का पोहोचतो आणि इतरांचे का नाही, हे त्या पांढरट केस झालेल्या आणि आयुष्यात बर्‍याचदा भीमसेन ऐकलेल्या मनुष्यास त्या वेळी पहिल्यांदा समजले.

वरच्या सगळ्या प्रसंगात जो बालक, तरुण, मध्यवयीन ग्रुहस्थ आहे तो मला सोमवारी भेटला. हे प्रसंग त्यानेच सांगितले होते अधीमधी.
त्यांचही वय झालय आता. साठीत आहेत ते, पण द्र्ष्टी कमजोर झाली आहे आणि ऐकू यायचे प्रमाणही. ते म्हणाले, "आज भीमसेन जोशी गेल्याचे कळले, लोक म्हणतील 'सुटले' म्हणून. खूप आजारी होते ना, पण नाही. मला वाटलं की भारतीय संस्क्रुतीचा मानबिंदू हरपला. झालं ते वाईट झालं. खूप विचार केला आज. पुल देशपांडे, ग.दि. माडगूळ्कर, कुमार गंधर्व, सुधीर फडके असल्या दिग्गजांच्या उमेदीच्या काळात मी वाढलो आणि माझं आयुष्य घालवलं, भीमसेनजींचे तर किती गाणे ऐकलं - स्वतःला किती नशीबवान समजू!"

मी आधीच व्यथीत होतो म्हणालो - " त्यांच्या म्रुत्युमुळे संस्क्रुती संपली, आता पुढे काय कुणास ठाउक!".

तो ग्रुहस्थ मला म्हणाला, 'संस्क्रुती संपायला तो काही सर्वसाधारण माणूस नाहिये. तो माणूस शरीररुपी गेला पण स्वररुपी अमर आहे. त्यांचा आवाज सतत अजून कुणाला तरी कायम बळ देतच राहील. तो स्वरभास्कर आहे, भास्कर उगवण्यासाठीच मावळत असतो."

खूप रिकाम्या पोकळीने मी तिथून काढता पाय घेतला.